Browse By

धर्मा पाटील यांच्यावर मंत्रालयात विष प्राशन करण्याची वेळ का अली. पहा काय आहे पूर्ण प्रकरण

धुळे जिल्ह्यातील शेतकरी धर्मा पाटील यांचे रविवारी रात्री उपचारादरम्यान निधन झाल्यानंतर सत्ताधाऱ्यांविरोधात संताप व्यक्त होत आहे.  भाजप सरकार शेतकरी विरोधी असल्याची टीका देखील होत असून अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर सत्ताधाऱ्यांची कोंडी झाली आहे. धर्मा पाटील यांची नेमकी मागणी काय होती, कशामुळे त्यांनी वयाच्या ८४ वर्षी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला, याचा घेतलेला हा आढवाा….

काय आहे प्रकरण?
धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा येथील विखरण गावात धर्मा पाटील आणि त्यांचे कुटुंबीय राहतात. राज्य सरकारने औष्णिक वीज प्रकल्पासाठी शिंदखेडा येथील शेतजमिनीचे भूसंपादन सुरु केले. यात धर्मा पाटील यांची पाच एकर जमीन संपादित झाली. यासाठी धर्मा पाटील यांना सरकारी दराने फक्त ४ लाख रुपयांचा मोबदला मिळाला.  तर शेजारील जमीन मालकाला बाजारभावाने मोबदला मिळाला, असा धर्मा पाटील यांचा दावा होता. धर्मा पाटील यांच्या शेतात ६०० आंब्याची झाडे लावली होती. तसेच बोअरवेल, विहीर देखील होती. प्रकल्पासाठी दिलेल्या जमिनीच्या चार पट मोबदला देण्याचे सरकारी धोरण असताना पाटील यांना फक्त ४ लाख ३ हजार रुपये इतकाच मोबदला मिळाला. तर लगतच्या शेतमालकांना जवळपास दीड कोटी रुपयांचा मोबदला मिळाला, असा पाटील कुटुंबीयांचा आरोप आहे.
दोन वर्षांपासून पाठवुरावा
दोन वर्षांपूर्वी धर्मा पाटील यांनी यासंदर्भात तक्रार दाखल केली. गेल्या तीन महिन्यांपासून मंत्रालयाचे हेलपाटे मारत होते. मात्र, न्याय मिळत नसल्याने पाटील यांनी गेल्या आठवड्यात मंगळवारी मंत्रालयातच आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांनी विषप्राशन केले होते. यानंतर त्यांच्यावर सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
ऊर्जा विभागाची भूमिका काय
पाटील यांच्या जमिनीबाबतचा अंतिम निवाडा धुळे जिल्हाधिकाऱ्यांनी दिला असून निवाड्याप्रमाणेच जमिनीचा मोबदला दिला, असे महानिर्मितीने म्हटले होते. आघाडी सरकारच्या काळात हा निर्णय झाला असून शेतकऱ्यांना हेक्टरी १५ लाख रुपये भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांची मागणी होती. त्यावेळी हेक्टरी १० लाख रुपये देण्याचे ठरले. मात्र, त्यानंतर तत्कालीन सरकारने निर्णय फिरवला, असा आरोप केला जात आहे. अखेरीस सोमवारी ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेऊन या प्रकरणात फेरमूल्यांकनाचे आदेश दिले आहेत.
मुख्यमंत्र्यांना दिले होते निवेदन
२ डिसेंबर २०१७ रोजी धर्मा पाटील यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना निवेदन दिले होते. मला योग्य न्याय मिळावा, अन्यथा आत्महत्येशिवाय पर्याय नसेल, असे त्यांनी निवेदनात म्हटले होते. तर त्यापूर्वी नोव्हेंबर २०१७ मध्ये महसूल मंत्री चंद्रकांत पाटील, पर्यटनमंत्री जयकुमार रावल यांना देखील निवेदन पाठवले होते. संरक्षण राज्यमंत्री सुभाष भामरे यांनी देखील डिसेंबर २०१७ मध्ये निवेदन देण्यात आले. मात्र, यानंतरही धर्मा पाटील यांना न्याय मिळत नव्हता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *